-
पुणे, ता. २६ : गेल्या २० वर्षांतील सर्वांत मोठ्या शिक्षक भरतीचा पहिला टप्पा राज्यात रविवारी (ता. २५) रात्री उशिरा पूर्ण झाला. शालेय शिक्षण विभागाने मुलाखतीशिवाय सुमारे ११ हजार नवीन शिक्षकांची भरती केली. त्यामुळे १० ते १२ वर्षांपासून भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या काही उमेदवारांना दिलासा मिळाला.
पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ नुसार 'मुलाखतीशिवाय' आणि 'मुलाखतीसह' या दोन प्रकारांतील जाहिरातीसाठी उमेदवारांकडून पाच ते १४ फेब्रुवारी कालावधीत प्राधान्यक्रम घेतले होते. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेतील आणि मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील रिक्त जागांसाठी उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड केली आहे. शिक्षक भरतीसाठी एकूण २१ हजार ६७८ जागापैकी मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ पदे होती. त्यातील ११ हजार ८५ उमेदवारांची शिक्षक म्हणून निवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. 'मुलाखतीसह' प्रकारातील उमेदवारांच्या मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी शिफारस यादी तयार ■ करण्याबाबतची कार्यवाही सुरू असून,
ती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, "पूर्णपणे पारदर्शक आणि कोणत्याही प्रभावाखाली न येता ही प्रक्रिया पूर्ण झाली. संपूर्ण प्रक्रिया सुरू असताना समाज माध्यमांवर उपस्थित झालेल्या प्रत्येक प्रश्नाला प्रशासनाने उत्तर दिले. तसेच अभियोग्यताधारकांच्या व्यक्तिगत संदेशांनासुद्धा उत्तरे देण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेत गैरप्रकार करण्यास कोणासही संधी मिळू नये, यासाठी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यांचे फोन रेकॉर्ड करावेत, फोटो ठेवावेत आणि अशांविरुद्ध थेट पोलिस तक्रार करावी, असे खुले आवाहन केले होते. अभियोग्यताधारकांना संभ्रमित करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी अनेकविध उपाययोजना केल्या गेल्या."
या प्रक्रियेदरम्यान काही प्रश्न अथवा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास त्याचे मंत्रालय स्तरावरून शिक्षणमंत्री आणि शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांनी तातडीने आणि प्रगल्भतेने निराकरण केल्यामुळे प्रक्रिया पुढे नेणे सुकर झाले, असे मांढरे यांनी सांगितले. भरती प्रक्रियेतून निवड झालेले नवीन शिक्षक विद्यार्थी घडविण्याच्या कामात त्यांचे पूर्ण योगदान देतील, अशी अपेक्षा मांढरे यांनी व्यक्त केली.
११ हजार शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी शिफारस
दि. १६ ऑक्टोबर २०२३ ते २२ जानेवारी २०२४ दरम्यान नोंद केलेल्या जिल्हा परिषद - १२ हजार ५२२, मनपा २ हजार ९५१, नगरपालिका- ४७७, खासगी शैक्षणिक संस्था- ५ हजार ७२८ अशा एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांसाठी जाहिराती आल्या. मुलाखतीशिवाय - १६ हजार ७९९ व मुलाखतीसह ४ हजार ८७९ अशी एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या पदभरतीची कार्यवाही होणार आहे.
एकूण १ हजार १२३ खासगी शैक्षणिक संस्थांनी ५ हजार ७२८ रिक्त पदांसाठी पवित्र पोर्टलवर मागणी नोंदविली आहे. जाहिरातीच्या अनुषंगाने दि. ५ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आले. त्यापैकी
मुलाखतीशिवाय या प्रकारासाठी संस्थांसाठी १ लाख ३७ हजार ७७३ उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत. तर मुलाखतीसह पदभरती या प्रकारातील संस्थांसाठी १ लाख ३३ हजार २७७ उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत. मुलाखतीसह पदभरतीसाठी ४ हजार ८७९
उमेदवार :
मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या १ हजार १८९ संस्थांना ४ हजार ८७९ रिक्त पदासाठी योग्य ती प्रक्रिया करून १:१० या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून दिले जातील. मुलाखत व अध्यापन कौशल्य याच्या आधारे निवड केली जाईल. यासाठी ३० गुणांची तरतूद केली असून उमेदवाराची निवड संस्था करणार आहे.
कागदपत्रे पडताळणीनंतर मिळणार नियुक्ती
उमेदवाराच्या मूळ कागदपत्राची पडताळणी केली जाईल, आणि पात्र उमेदवारांना शासन निर्णय दिनांक २१ जून २०२३ मधील तरतुदीनुसार समुपदेशन पद्धतीने नियुक्ती आदेश दिले जातील, त्यामध्ये दिव्यांग व महिलांना प्राधान्य दिले जाईल. काही उमेदवारांच्या बाबतीत सक्षम प्राधिकारी यांचेकडून कागदपत्राची आवश्यक ती पडताळणी करणे गरजेचे आहे, अशा उमेदवारांना योग्य त्या पडताळणीनंतर नियुक्ती देण्याची कार्यवाही होणार आहे.


No comments:
Post a Comment