पुणे : शिक्षक भरती प्रक्रियेत
संगणकाद्वारे जिल्हा परिषद शाळा आणि संस्थांमधील नियुक्तीसंदर्भात पात्र अभियोग्यताधारकांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया संगणकावर आधारित असून त्यात कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.
'भरतीप्रक्रियेत दलाल तसेच खाजगी व्यक्तींकडून अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी भूलथापांना बळी न पडता सावध राहावे, अशी सूचना शिक्षण आयुक्त कार्यालयाने केली आहे.
संगणकाद्वारे आपोआप होणाऱ्या प्रक्रियेचे श्रेय घेऊन काही मंडळी अशा प्रकारे अभियोग्यताधारकांची फसवणूक करू शकतात. त्या सर्व बाबींना पायबंद घालण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे. असे दलाल अथवा अन्य मंडळी कृत्य करीत असतील तर तातडीने ती बाब प्रशासनाचे अथवा नजीकचे पोलिस ठाण्याच्या निदर्शनास आणून द्यावी.
- सूरज मांढरे आयुक्त (शिक्षण)
जिल्हा परिषद शाळेमध्ये नोकरी लावून देतो, विशिष्ट संस्थेच्या शाळेत भरती करून देतो, जवळच्या संस्थेत नोकरी देतो, अशी खोटी आश्वासने देऊन मागील भरतीच्या वेळी काही दलालांनी उमेदवारांची फसवणूक केली होती. त्याप्रमाणे यावेळी फसवणूक होण्याची शक्यता काही अभियोग्यताधारकांनी व्यक्त केली आहे. अशा प्रकारे कोणी फसवणूक करत असेल तर
जवळच्या पोलिस ठाण्याकडे तातडीने फिर्याद दाखल करावी. प्रशासनाकडून फिर्यादीची दखल घेत तक्रारदारास पूर्ण सहकार्य केले जाईल. दरम्यान, असा खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्ती तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींवर पोलिस विभागामार्फत स्वतंत्रपणे नजर ठेवली जात असल्याचे शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment