लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शिक्षक भरती प्रकरणी दिलेल्या अंतरिम आदेशावर औरंगाबाद खंडपीठात मंगळवारी सुनावणी होत आहे. त्यामुळे शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी मुदतवाढ मिळू शकते. तसेच यामुळे भरती प्रक्रिया लांबण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
सेमी इंग्रजी शाळांमध्ये मराठी उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा मिळावी यासाठी मराठी माध्यमाच्या उमेदवारांनी ७ फेब्रुवारीला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्यावर दि. ९ रोजी सुनावणी झाली. त्यामध्ये न्यायालयाने मराठी
माध्यमाच्या उमेदवारांना सेमी इंग्रजी शाळेसाठी प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असा अंतरिम आदेश दिला आहे. मात्र, त्यावर शिक्षण आयुक्त कार्यालयातर्फे शासनाची बाजू ऐकून घ्यावी, अशी विनंती केली असून यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
बी.सी.ए. उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट झाले नाहीत. ई- मेलवरून तक्रार करूनही त्यांना अनेक दिवस उत्तर, स्पष्टीकरण मिळाले नाही त्यामुळे या उमेदवारांचीही कोंडी झाली असून त्यांनीही न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, रविवार ११ फेब्रुवारीअखेर सव्वा लाख उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले होते.
No comments:
Post a Comment