• शिक्षक पदभरतीसाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम लॉक करून घेतल्यानंतर यंत्रणेकडील काम प्रगतीपथावर सुरू आहे. अनेक उमेदवारांना समान गुण असल्यामुळे समान गुण असल्यास प्राधान्यक्रम ठरविण्याच्या तरतुदी विचारात घेवून उमेदवारांचे योग्यक्रम तपासण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे.
• शिक्षक पदभरती प्रकरणी मा. न्यायालयाकडून एकतर्फी अंतरिम आदेश होणार नाहीत, याबाबत उचित दक्षता घेणेबाबतची विनंती मा. उच्च न्यायालयातील सर्व शासकीय अभियोक्ता यांना लेखी पत्राद्वारे करण्यात आलेली आहे.
• शिक्षक भरती आता महत्वाच्या टप्यावर पोहोचली असून पात्र अभियोग्यताधारकांना संस्था/जिल्हा परिषदेमधील नियुक्ती संदर्भात याद्या तयार करण्याचे संगणकीय कामकाज सध्या सुरू आहे. ही पूर्णपणे पारदर्शक व संगणकावर आधारित प्रक्रिया असून त्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे.
• असे असतानाही अभियोग्यताधारकांमधील काही स्वयंघोषित खोडसाळ व्यक्ती तसेच काही दलाल या प्रक्रियेबाबत अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमुक जिल्हा परिषदेमध्ये नोकरी लावून देतो, अमुक संस्थेत भरती करुन देतो जवळच्या संस्थेत नोकरी देतो इत्यादी प्रकारे खोटी आश्वासने देवून फसवणूक होण्याची शक्यता काही अभियोग्यताधारकांनी व्यक्त केली आहे. याबाबींकडे सर्व अभियोग्यताधारकांनी दुर्लक्ष करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
• संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप होणाऱ्या प्रक्रियेचे श्रेय घेवून काही मंडळी अशा प्रकारे फसवणूक करु शकतात. या सर्व बाबींना पायबंद घालण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे. असे दलाल अथवा अन्य मंडळी कृत्य करीत असतील तर त्याचे टेलीफोन संभाषण अथवा फोटो इत्यादी पुरावे जतन करून ठेवावेत व अशा प्रकारे कोणी फसवणूक करत असेल तर संबंधित पोलीस ठाण्याकडे तातडीने फिर्याद दाखल करावी. अशी फिर्याद दाखल केल्यास
प्रशासनाकडून देखील अशा तक्रारदारास पूर्ण सहकार्य केले जाईल.
• दरम्यान असा खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्ती तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती यांचेवर पोलीस विभागामार्फत स्वतंत्रपणे निगरणी ठेवणेत येत आहे.
• सदरची प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या या पदभरती प्रक्रियेत कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनास सहकार्य करावे.

No comments:
Post a Comment